Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस संक्रमीत रुग्णांची वाढती संख्या पाहता पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषीत करण्यात आला आहे. यासोबतच शहराच्या सर्व सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. कोविड 19 (COVID 19) रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका (PCME) प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 19 एप्रिल 2020 पासून शहराच्या सर्व सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. हे आदेश 27 एप्रिल 2020 पर्यंत लागू असणार आहेत. तसेच, पुढे परिस्थिती नेमकी कशी निर्माण होते त्यानुसा पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

दरम्यान, शहराच्या सर्व सीमा बंद असल्या तरी, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी अत्यावश्यक सेवा देणारे सरकारी कर्मचारी, कोविड 19 विषाणू संदर्भात उपाययोजना करणारे अधिकारी, कर्मचारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, पोलीस विभागाचे, राज्य, केंद्रीय विभागांचे कर्मचारी, वाहने आदी घटकांना सीमा बंदी असणार नाही. यासोबतच अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक करण्यासही या आदेशात मुभा आहे.

दरम्यान, पुणे महापालिका क्षेत्रामधील सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यालयात केवळ 10% उपस्थिती राखण्याबाबत नियोजन करणे आवश्यक राहणार आहे. तसेच, शासकीय कार्यालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पास महानगर पालिकेतर्फे उपलब्ध करुन दिले जातील, असेही पालिका आयुक्तांच्या कार्यालयात म्हटले आहे. (हेही वाचा, धारावीला कोरोनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेचे 20 डॉक्टर, 50 परिचारिका यांच्यासह एकूण 2 हजार 484 कर्मचारी सेवेसाठी सज्ज)

ट्विट

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 62 इतकी आहे. त्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 37 आहे. तर आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 17 इतकी आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने आतापर्यंत कोविड 19 चे 1477 नमूणे चाचणीसाठी घेतले. त्यातील 1413 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालानुसार 1358 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत 3289 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 1017 जण होम क्वारंटाईन आहेत.