Coronavirus Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबईत (Mumbai)आढळले आहे. आता धारावी (Dharavi) परिसरातही कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. महत्वाचे म्हणजे, धारवी परिसरात मोठ्या संख्येने लोक राहतात. दरम्यान, कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडत गेली तर, यावर नियंत्रण मिळवणे प्रशासनाला अवघड जाण्याची शक्यता आहे. यातच धारावीला कोरोनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेचे 2 हजार 484 कर्मचारी सज्ज झाले आहेत. यात 20 डॉक्टर, 50 परिचारिका, 25 अभियंते, 40 सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक आणि 2 हजार 150 इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच राजीव गांधी क्रिडासंकुलात परिसरात होम क्वारंटाइनची सुविधा पुरवण्यात येत आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाचे जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. रविवारी दिवसभरात 20 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 138 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींची संख्या 11 वर पोहोचली आहे.प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. लवकरच धारावी परिसरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी किटस् उपलब्ध न झाल्यामुळे अजूनही या टेस्टला सुरुवात झालेली नाही. हे देखील वाचा- Bandra Incident: वांद्रे स्थानक गर्दी प्रकरणातील 10 आरोपींना 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

एएनआयचे ट्वीट-

धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. येथील लोक घराबाहेर पडू नये, म्हणून या परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्री प्रत्येकी जेवणाच्या पाकिटांचे वितरण, विविध धान्य आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या पाकिटांचे वाटप तसेच गरजवंतांना औषधांचाही पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे.