| (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. याच कारणास्तव राज्यात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याच दरम्यान आता पालघर (Palghar) नगर परिषद क्षेत्रात उद्यापासून पुढील 4 दिवस संपूर्ण लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पालघर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. तसेच आपत्कालीन कायदा व साथीरोग प्रतिबंधात्मक नियमाखाली आदेश निर्गमित केले आहे. पालघर मध्ये सोमवारी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. तरीही नागरिकांकडून लॉकडाउनचे आदेश पाळले जात नाही आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

पालघर नगर परिषदेच्या क्षेत्रात उद्या सकाळी 8 वाजल्यानंतर शहरामध्ये मेडिकलच्या दुकानाशिवाय कोणतीही आस्थापने सुरु राहणार नाही आहेत. तसेच या कालावधीत कोणत्याही प्रकारची भाजीपाला, फळे, किराणा, चिकन, मटण, दुध विक्री करण्यास मनाई असल्याची सुचना नागरिकांना देण्यात आली आहे. तसेच आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(नागपूर मधील सतरंजीपूरातील 750 जणांसह अजून 500 जणांना क्वारंटाइन करण्यात येणार- तुकाराम मुंढे)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. परंतु 3 मे नंतर कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. मात्र ग्रीन झोन मधील नागरिकांना लॉकडाउन संदर्भातील परिसरांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.