महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने आता लॉकडाउन येत्या 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाच्या विरोधातील लढाई आपण जिंकरणाच असा विश्वास ही त्यांनी दर्शवला आहे. मात्र आता लॉकडाउन वाढवल्याने नागरिकांनी अधिक गांभीर्याने वागणे महत्वाचे आहे. तर मुंबईतील दाटीवाटीच्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचा अभाव दिसून येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होऊ शकतो. हिच परिस्थिती धारावी (Dharavi) येथे असल्याने तेथे कोरोनाबाधितांचा आकडा 22 वर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. याच कारणास्तव आता तेथील लघु उद्योगाला मोठा फटका बसला आहे.
धारावी परिसरात मोठ्या प्रमाणात झोपट्टीपट्टी आहे. मात्र येथेच बहुतांश लघु उद्योग असून त्यांचा माल बाहेरगावी एक्सपोर्ट ही केला जातो. मात्र लॉकडाउनच्या काळात लघु उद्योग गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने येथील कामगार अडकून पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मागील 20 दिवसांपासून लेदर मार्केट पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे जवळजवळ 19 हजारांपेक्षा अधिक मजूर रस्त्यावर आले आहेत. या मजूर वर्गाचे हातावर पोट असल्याने त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही आहे. तसेच प्रवासासाठी कोणतेही वाहन नसल्याने त्यांना आपल्या घरी सुद्धा जाता येत नाही आहे. परंतु लघु उद्योगातील स्थानिक मालकांकडून त्यांच्या दोनवेळच्या खाण्यापिण्याची सोय केली जात असल्याचे तेथील कामगारांनी स्पष्ट केले आहे.(Coronavirus: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? किती जणांचा मृत्यू? घ्या जाणून)
दरम्यान, धारावीत आज कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. तसेच महापालिकेला मदत करण्यासाठी 150 डॉक्टरांच्या पथकाकडून आजपासून धारावीत स्थानिकांची स्क्रिनिंगद्वारे चाचणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. ऐवढेच नाही तर कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक शौचलये स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केले आहेत.