Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक बेरोजगार मजूर, कामगारांनी (Migrant Labourers) आपल्या गावची वाट धरली आहे. मिळेल त्या मार्गाने प्रवास करत गावी पोहचण्यासाठी ते धडपडत आहेत. दरम्यान 17 स्थलांतरीत कामगारांना घेऊन प्रवास करणाऱ्या टेम्पोला काल (रविवार, 29 मार्च) अंधेरी (Andheri) येथे अडवण्यात आले. पोलिसांच्या पाहाणीनंतर सर्व कामगारांना आपापल्या घरी पाठवण्यात आले असून टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक सेवा ठप्प झाल्याने कामगार, मजूर अशा प्रकारचा जीवघेणा प्रवास करतानाचे अनेक व्हिडिओज समोर आले आहेत. याला आळा बसण्यासाठी आता प्रत्येक नाक्यावर पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. प्रत्येक वाहनचालकाचे पास, आयडी प्रुफ तपासले जात आहेत. (संचारबंदीत वाहनांची वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी)

ANI Tweet:

लॉकडाऊनच्या निर्णयानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले. मात्र मजूर बेरोजगार, बेघर झाले. त्यांच्यापुढे मुलभूत गरजांचा प्रश्न उभा राहीला आणि त्यातूनच त्यांनी घर परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रवास टाळा आणि आहात तिथेच रहा असे आवाहन सरकारकडून करण्यात येत होते. त्यामुळे पेचात सापडलेल्या मजूरांनी हा मार्ग निवडला. मात्र आता महाराष्ट्र राज्यात स्थलांतरीत मजूरांसाठी 262 मदत केंद्रांची उभारणी करण्यात आली असून त्यांच्या अन्नाची आणि आश्रयाची सोय केली जाणार आहे.