कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांच सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या संख्येत नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहेत. दरम्यान, नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच पोलिसांवर कडक पावले उचलण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी नागरिकांना दिला आहे.
हेमंत नगराळे यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. मात्र, अजून सुद्धा काहीजण राज्य सरकारच्या सूचनांचे पालन न करता घराबाहेर पडताना दिसत आहेत. यामुळेच आता निर्बंध अजून कठोर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. तशा सूचना स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असे नगराळे म्हणाले आहेत. तसेच पोलिसांना संयमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण त्यांच्यावर कडक पावले उचलण्याची वेळ आणू नका, असा इशारा नगराळे यांनी नागरिकांना दिला आहे. हे देखील वाचा- Maharashtra: उपचार देऊ शकत नाहीत तर वडीलांना इंजेक्शन देऊन मृत्यू द्या, चंद्रपुरात मुलाची हाक
दरम्यान, मुंबई पोलिसांनी गुरुवारी (15 एप्रिल) एका मास्क न घालणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मास्क घालण्यास सांगितल्यावर त्याने ट्रॅफिक पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. ही घटना मुलुंड मध्ये काल सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे. त्यानंतर या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे.