ड्रोन (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी नागरिकांकडून लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर झोपट्ट्यांच्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे शक्य नाही आहे. त्यामुळे अशा परिसरात आता ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असल्याचे यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते. तरीही नागरिकांना कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात येत नसल्याचे दिसून येत आहे. याच कारणास्तव आता मुंबईतील धारावीसह अन्य झोपडपट्ट्यांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

राज्यातील नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये असे वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही नागरिक सकाळच्या वेळेस भाजी खरेदी करण्यासाठी किंवा एखादे कारण सांगून घराबाहेर पडत आहे. परिणामी रस्त्यावर गर्दी होताना सुद्धा दिसून आले आहे. वांद्रे परिसरात आतापर्यंत 184 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे वांद्रे येथील बेहरमपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वर नगर आणि पत्थर नगर येथील स्थानिकांवर ड्रोनची नजर असमार आहे. त्याचसोबत नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे अशा सुचना सुद्धा दिल्या जात आहेत.(Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार गेला आहे. तर महाराष्ट्रातीस मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रेड झोनमध्ये असलेल्या शहरांत लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाच्या नॉन-हॉटस्पट ठिकाणी लॉकडाउनचे काही नियम शिथिल केले आहेत. मात्र देशात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. परंतु 3 मे नंतर लॉकडाउनबाबत काय निर्णय केंद्र सरकार देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.