Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच कारणास्तव लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयातील डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. तर महापालिकेने कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या मुंबईतील जवळजवळ 150 पेक्षा अधिक परिसरांना सील केले आहे. त्यापैकीच एक धारावी येथे सुद्धा कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज पुन्हा कोरोनाबाधित 2 नवे रुग्ण आढळून आल्याने परिसरातील आकडा 5 वर पोहचला आहे.राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने ही एक चिंतेची बाब आहे.

कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला असून शुक्रवारी धारावीतील एका 35 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज पुन्हा कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्याचे 2 नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा 5 वर पोहचला आहे. या 2 कोरोनाग्रस्तांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. (कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी मुंबई मधील 23 हॉस्पिटल्समध्ये अलगीकरण सुविधा; पहा हॉस्पिटल्सची संपूर्ण यादी)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात खरोखरच आता संकटाचा काळ आहे देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. अशावेळी नागरिकांना वारंवार घरी राहून लॉक डाऊनचे पालन करण्यास सांगितले जात आहे. जर का 15 एप्रिल पर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर लॉक डाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो असे संकेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.