कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव भारत देशात वाढताना दिसत आहे. कोरोनाग्रस्तांची सातत्याने वाढणारी संख्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. त्याचबरोबर चिंता आणि काळजी यात भर पडत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यापैकी कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबई मध्ये अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्कतेने गोष्टी हाताळत आहे. तसंच खास खबरदारी सह वैद्यकीय सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. कोरोना बाधितांच्या उपचारासाठी मुंबई (Mumbai) मधील काही रुग्णालयात अलगीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. याची यादी महाराष्ट्र सीएमओ या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे.
तसंच कोरोनाच्या फैलावाला आळा घालण्यासाठी राज्यभरातील एकूण 18 जिल्ह्यांमध्ये 2455 पथके नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम करत असून त्या अंतर्गत 9 लाख 25 हजार 828 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ही सर्व पथके सर्व वैद्यकीय उपकरणांसह सुसज्ज आहेत. ज्या भागात कोरोनाचे 3 किंवा त्याहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत तेथून साधारणपणे 3 किलोमीटर पर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले जात आहे. पथकांना नेमून दिलेल्या भागांमध्ये 14 दिवस दररोज सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पथकांमार्फत सर्वेक्षणांसोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे कामही केले जात आहे. तसंच कोरोना बाबत जनजागृतीचेही कामही ही पथके करत आहेत. (महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 47 रुग्ण आढळल्याने आकडा 537 वर पोहचला)
CMO Maharashtra Tweet:
कोविड-१९ च्या उपचारासाठी मुंबईमधील अलगीकरण सुविधा:#WarAgainstVirus pic.twitter.com/YzHvMZEFHj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 4, 2020
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी सज्ज केली आली आहेत. या रुग्णालयात केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असून 2305 बेड्स सोय कोरोनाग्रस्तांसाठी केली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या 537 झाली आहे. दिवसागणित त्यात नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहून पॅनिक न होता या हॉस्पिटल्सची यादी गरजू व्यक्ती पर्यंत पोहचा.