Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातले आहे. तसेच सरकारकडून नागरिकांना घरात थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऐवढेच नाही तर येत्या 14 एप्रिल पर्यत लॉकडाउनचे आदेश देऊन सुद्धा नागरिक रस्त्यावर मोकाट फिरताना दिसून येत आहे. याच कारणास्तव कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यासोबत तुलना केली असता महाराष्ट्रातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून आता कोरोनाबाधितांची नवी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात कोरोनाचे नवे 47 रुग्ण आढळून आले असून आकडा 537 वर पोहचला आहे.

देशभरातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. तसेच पोलीस सुद्धा रस्त्यावर गस्त घालून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन वारंवार करत आहे. मात्र तरीही कोरोनाबाधितांच्या आकड्यात भर पडत आहे. त्यानुसार राज्यात आता कोरोनाचे नवे 47 रुग्ण आढळून आले असून आकडा 537 वर पोहचला आहे. नव्या 47 रुग्णांपैकी 28 जण हे मुंबई, 15 जण ठाणे, 1 अमरावती, 2 पुणे, 1 पिंपरी-चिंचवड येथील आहेत. याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.(अमरावतीमध्ये 2 एप्रिल रोजी मृत्यू झालेला 45 वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची माहिती)

दरम्यान, सध्या लॉकडाउनच्या काळत नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा दिल्या जात आहेत. तरीही नागरिकांची गर्दी काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. ऐवढेच नाही आता पोलिसांकडून सुद्धा बेजबाबदार आणि नियांमाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा नियमांचे पालन न करणाऱ्यांची आता खैर नाही असा इशारा दिला आहे.