कोरोना व्हायरस (Coronavirus) आव्हान ठरला असतानाच आता मकड ताप (Monkey Fever) महाराष्ट्रासमोर नवे आव्हान निर्माण करतो की काय अशी स्थिती आहे. माकड तापाची लागन होऊन कोकणात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मंकी तापाचे बळी ठरलेले दोघेही सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील आहेत. माजगाव येथील लक्ष्मण शिंदे आणि दिनेश शांताराम देसाई (४५, रा. डेगवे – मोयझरवाडी) अशी माकड तापामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या हंगामात माकडतापाने अल्पावधित घेतलेला हा दुसरा बळी आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
दिनेश शांताराम देसाई हे गेले दीड महिने झाले माकड तापाने त्रस्त होते. त्यांच्यावर बांबोळी येथील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचे मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना 8 फेब्रुवारी या दिवशी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. देसाई यांची माकड ताप चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर बरेच दिवस (दीड महिना) उपचार सुरु होते. मात्र, त्यांच्या शरीराने उपचारांना अपेक्षीत प्रतिसाद दिला नाही. परिणामी त्यांचा माकड तापातच मृत्यू झाला. लोकसत्ता डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे.
साधारणपणे, ताप, सांधेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा ही माडतापाची प्राथमिक लक्षणे सांगितली जातात. तसेच, या आजारामध्ये ताप गेला तरी सांधेदुखी कायम राहते, असाही अनुभव काही लोक व्यक्त करतात. (हेही वाचा, Coronavirus: 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त धोका; वाचा काय सांगतेय सर्वेक्षण)
दरम्यान, या आधी साधारण दोन आठवड्यापूर्वी माजगाव येथील लक्ष्मण शिंदे यांचाही माकड ताप आल्यानेत मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे माकड ताप चाचणी पॉझिटिव्ह आलेले तिघेजण बांबोळी येथे अद्यापही उपचार घेत आहेत. त्यातील एक जण उपचार घेऊन घरी परतला आहे. मात्र, परिसरात संशय आणि भीती निर्माण झाली आहे. माकड तापाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.