Coronavirus: मीरा रोड येथे 55 वर्षीय वृद्धाची मृत्यूनंतर कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तसेच येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश लागू राहणार आहेत. मात्र 3 मे नंतर लॉकडाउन संदर्भातील निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. तर मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने ते क्षेत्र रेड झोन मध्ये आहेत. याच दरम्यान आता, मीरा रोड येथील एका 55 वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार समोर आला आहे. या वृद्धाचा 29 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. मात्र आता या प्रकारामुळे कोरोनाची परिस्थती पाहता परिसरात खळबळ उडाली आहे. मीरा रोड- भायंदर आता पर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या तिघांची सुद्धा शुक्रवारी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मीरा रोड येथील नायानगर मधील हरिदारी चौक येथे राहणारा रुग्ण असून त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो रुग्ण पेशाने गाड्या दुरुस्ती करण्याचे काम करत होता. या व्यक्तीचा 29 एप्रिलला मृत्यू झाल्यानंतर त्याची कोरोनची चाचणी आता पॉझिटिव्ह आली आहे. अजून तीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मीरा-भायंदर रोड येथे राहणारी 13 वर्षाची मुलगी तिला कोरोनाची लागण झाली आहे. तर 55 वर्षीय भायंदर मधील कोळीवाडा येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिला दहिसर मधील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून एका 21 वर्षीय मुलगी जी भायंदर पश्चिम येथे राहते तिची ही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तरुणीला मीरा-भायंदर मधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(मुंबईतील INS Angre या नौदल तळावरील 38 कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांपैकी 12 जणांना डिस्चार्ज)

विविध परिसरातून आतापर्यंत एकूण 161 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने लॉकडाउनच्या आदेशाचे 3 मे पर्यंत पालन करण्याची सुचना देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची घरपोच सेवा आणि बेकरी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आली आहे.