Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात बैठक, राजभवनावर राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या; चर्चांना उधान
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sanjay Raut | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात काल (25 मे) रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते. शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवनावर जाऊन काल सायंकळी भेट घेतली. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या भेटीगाठी आणि बैठकांचा धडाका पाहता सर्वच काही अलबेल सुरु नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीतील नेमका तपशील अद्याप बाहेर आला नाही. मात्र, महाराष्ट्राविषयी केंद्र सरकार काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून बोलून दाखवली जात आहे.

गेल्या काही काळापासून भाजप नेते राज्यपालांना वारंवार भेटत आहेत. यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपले शिष्टमंडळ घेऊन भेटत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला खा. नारायण राणे, माजी खा. किरीट सोमय्या यांच्यासह अनेक मंडळी राज्यपालांची भेट घेऊन येत आहेत. नारायण राणे यांनी तर काल राज्यपालांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे सरकार हे कोरोना संकटाची स्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

नारायण राणे यांच्या प्रतिक्रियेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप केला. मात्र, हा डाव कदापीही यशस्वी होणार नाही, असेही राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, “राणे कोण आहेत ? असा निर्णय घेण्याची मागणी करण्याचा कोणता अधिकार त्यांच्याकडे आहे ? राजभवनातून निमंत्रण आल्याने मी राज्यपालांना भेटायला गेलो होतो. चर्चेदरम्यान राज्यपालांनी राज्य सरकारला करोनाची स्थिती हाताळणं कठीण जात असल्याचा उल्लेख केला. पण मी त्यांना परिस्थिती नियंत्रणात असून मुख्यमंत्री सर्वात पुढे राहून लढा देत आहेत. प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत असं सांगितलं”. (हेही वाचा, Lockdown: रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा निशाणा म्हणाले, 'राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका')

दरम्यान, शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. मात्र, राज्यातील कोरोना संकट, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केली जाणारी उपाययोजना तसेच केंद्र सरकारने आयत्या वेळी काही पावले उचललीच तर त्याबाबात आपली रणनिती काय? याबाबात चर्चा झाल्याचे तर्क काढले जात आहेत.