Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात थैमान घातला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे प्रत्येकासमोर कोरोना विषाणूचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून (State Government) युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्राचे (Maharashtra)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोना विरोधात लढाई जिंकण्यासाठी आतापर्यंत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात जमावबंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संचारबंदी लागू केली आहे. मात्र, कोरोनाच्या विळख्यातून अद्यापही राज्याची सुटका झाली नसून उद्धव ठाकरे यांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाविरोधातील उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महत्वाची भुमिका बजावत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणूपासून राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मोठे पाऊल उचलले आहेत. दरम्यान, 'खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये', असे आवाहन नुकतेच उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 'खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात', त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाने सुरु ठेवावे असे ते म्हणाले होते. हे देखील वाचा- Coronavirus: रेल्वेमध्ये तयार होणार कोरोना ग्रस्तांसाठी हॉस्पिटल; एसी कोच आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय

तसेच, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने 24 तास उघडी ठेवण्याची परवानगी त्यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी घोषणा केली. लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावी यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता