
कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus Infected Patient) असल्याची पुष्टी झालेला एक रुग्ण चक्क रुग्णालयातून पळाल्याचे वृत्त आहे. हिंगोली जिल्हा रुग्णालयात (Hingoli District Hospital) घडलेल्या या घटनेमुळे परिसर आणि आरोग्य विभागात (Health Department) मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टरांचा हालर्जीपणामुळेच हा रुग्ण पळाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, डॉक्टरांनी मात्र, याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे म्हणत कानावर हात ठेवले आहेत. दुसऱ्या बाजूला या रुग्णाचा शोध घेतला जात असून पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडूनही या रुग्णाचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.
प्रशासनाचा डोळा चुकवून रुग्णाचा पोबारा
हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीची कोविड (COVID-19) चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली. त्यामुळे सदर रुग्णावर प्रथमोपचार करुन त्याला रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया डॉक्टरांकडून सुरु होती. दरम्यान, रुग्णाला याबाबत माहिती मिळताच त्याने प्रशासनाचा डोळा चुकवून पोबारा केला. काहीच वेळात डॉक्टरांना रुग्ण उपस्थित नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी धावाधाव सुरु केली. पण, रुग्णालय परिसरात हा रुग्ण कोठेच आढळून आला नाही. रविवारी पळालेला हा रुगण सोमवार उजाडला तरीही सापडला नाही. त्यामुळे भीती व्यक्त करण्यात येऊ लागली. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात येणारे इतरही लोक संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे रुग्णाचा शोध घेतला जात आहे. (हेही वाचा, COVID-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने पसार, देशात JN.1 चे 63 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे)
पोलिसांकडूनही रुग्णाचा शोध
सदर रुग्ण हा छातीत दुखत असल्याचे कारण घेऊन रुग्णालयात आला होता. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी त्याची कोरोना व्हायरस चाचणी केली. जी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे त्याला प्राथमिक उपचार आणि औषधे देऊन रुग्णालयात दाखल करुन घेण्याची तयारी डॉक्टरांनी सुरु केली. दरम्यान, पुढचे उपचार सुरु करण्यापूर्वीच या रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले. हा रुग्ण पळाळ्याने आरोग्य विभागासह परिसरात खळबळ उडाली आहे. हा रुग्ण कोरोना संक्रमितांची संख्या वाढवू शकतो. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनीही पथके तयार करुन रुग्णाचा शोध सुरु केला आहे. या रुग्णाचा अद्यापपर्यंत तरी पत्ता लागला नव्हता.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून रुग्ण पळाल्याच्या घटनेबाबत गुप्तता बाळगली जात होती. मात्र, अखेर ती बातमी फुटलीच. परिणामी रुग्णालय प्रशासनावरील ताण वाढला आहे. तसेच, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणारे रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांच्याही मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.