कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतामध्ये शिरकाव केल्यानंतर, केरळ, दिल्ली त्यांनतर महाराष्ट्र प्रभावित व्हायला सुरुवात झाले. आता देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात पुणे (Pune) जिल्ह्याची स्थिती अतिशय गंभीर बनत चालली आहे. गेल्या काही दिवसात वाढलेल्या कोरोनाचा घटनांमुळे पुणे हा देशातील असा पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे दोन लाखांहून अधिक कोरोना संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी पुण्यातील संक्रमित लोकांच्या 4,165 रुग्णांसह इथली एकूण रुग्ण संख्या 2,03,468. वर पोहोचली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणीची संख्या वाढल्यानंतरच जिल्ह्यात संसर्ग होण्याचे अधिक प्रमाण समोर येत आहे. पुण्यात 5 ऑगस्ट रोजी कोविड-19 संसर्गाची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आणि एका महिन्यात हा आकडा दुप्पट झाला. पुण्याच्या तुलनेत सोमवारपर्यंत दिल्लीत संसर्ग होण्याची एकूण संख्या 1,93,526 होती तर मुंबईत 1,57,410 इतकी प्रकरणे आहेत.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या मते, जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण 22 टक्के आहे. ते म्हणाले, 'संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये पुणे सध्या देशात अव्वल स्थानी आहे, त्याचे कारण जिल्हा प्रशासनाच्या तपास प्रक्रियेची गती हे आहे. पुण्याखेरीज अन्य कोणताही जिल्हा इतक्या वेगाने तपास करत नाही.’ (हेही वाचा: मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळल्याने आकडा 2830 वर पोहचला-BMC)
जास्त चाचण्या, रुग्णांचा मागोवा घेणे आणि त्यांचा शोध काढणे हे पुण्यातील रुग्ण वाढीमागील मुख्य घटक आहेत. सेरो सर्व्हेक्षणमध्ये जवळजवळ 50 टक्के रुग्णांमध्ये Antibodies आढळल्या आहेत. कोविड-19 प्रकरणांची संख्या जास्त असूनही पुण्यात रिकव्हरीचे प्रमाण खूप जास्त आहे. आतापर्यंत इथे जवळजवळ 78 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार आतापर्यंत 1.57 लाखांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. पुणे शहरातील एकूण तपासणी आता 4,94,771 झाली असून काल 3,354 टेस्ट घेण्यात आल्या.