Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

तब्बल 42 दिवसानंतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रकरणांनी महाराष्ट्रात जोर धरला आहे. हा वाढलेला वेग भयानक आहे कारण पुन्हा एकदा दररोज कोरोनाची 3 ते 4 हजार प्रकरणे समोर येत आहेत. मुंबईची (Mumbai) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत अधिकारी व सरकारची चिंताही वाढत आहे. मुंबईत महापौरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर लोकांनी मास्क घातले नाहीत तर शहरात लॉकडाऊन सुरु केले जाईल. बीएमसीनेही मान्य केले आहे की, मुंबईत कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये 10-12% वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन महानगरपालिकेने 31 मार्चपर्यंत आपले मोठे कोविड सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जर ही प्रकरणे वाढत राहिली, तर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांच्या देखरेखीसाठी मोठ्या कोरोना सेंटरचा उपयोग केला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळलेल्या चेंबूर परिसराच्या एम-वेस्ट वॉर्डच्या वतीने सोसायटी आणि फेरीवाल्यांची कोरोना तपासणी केली गेली. येथे कोरोनाचे बहुतेक रुग्ण उंच इमारतींमध्ये आढळले आहेत.

अशात मुंबईमधील कोरोना हॉटस्पॉटची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

  • बोरिवलीत सध्या 408 सक्रिय कोविड-19 प्रकरणे आहेत. इथे आतापर्यंत, 643 लोक या प्राणघातक व्हायरसला बळी पडले आहेत.
  • अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम आणि के.एम. वॉर्ड अंतर्गत विलेपार्ले हे मुंबई शहरातील जास्त सक्रीय प्रकरणे असलेला दुसरा परिसर आहे. या भागात एकूण 378 सक्रिय प्रकरणे आहेत. या भागात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत.
  • मुंबईतील कांदिवली आणि चारकोप भागात कोरोनाचे 345 सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर इथे 522 लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत.
  • के-पूर्व प्रभाग अंतर्गत अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि विलेपार्ले पूर्वे भागात 338 सक्रिय प्रकरणे आहेत.

मुलुंडमध्ये 290 हून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत, तर या भागात मृतांचा आकडा 370 वर पोहोचला आहे. रविवारीपर्यंत या भागातील 202 इमारती सीलबंद केल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. (हेही वाचा: Mumbai: नागरिकांनी कोरोनाच्या काळात काळजी घ्यावी अन्यथा दुसरा लॉकडाऊन करावा लागेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन)

घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, चेंबूर आणि टिळक नगर हे अजून काही परिसर आहेत जिथे कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत कोरोनाच्या ताज्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड-19 संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल लोकांबद्दल नाराजी व्यक्त केली.