Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

जगासह भारत देशही कोरोना व्हायरस या जागतिक संकटाचा मुकाबला करत आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानी आहे. त्यामुळे निश्चितच राज्य सरकारसह राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण अधिक आहे. हाच ताण काहीसा हलका करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील खाजगी डॉक्टर, निवृत्त वैद्यकीय कर्मचारी, सैन्य दलातील डॉक्टर्स, मेडिकल विभागाचे अनुभव असणारे अधिकारी, कर्मचारी, नर्सेस, मेडिकलचे प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी यांना संकट काळात मदत करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी इच्छुकांनी covidyoddha@gmail.com या मेल आयडीवर आपली माहिती द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये सांगितले. (जाणून घ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबूक लाईव्ह मधील महत्त्वाचे मुद्दे)

त्यानंतर या ईमेलवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर अनेकांना Address not found असा संदेश पाहायला मिळत आहे. मात्र या तांत्रिक समस्येचे निराकरण झाले असून आपली माहिती परत पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

CMO Maharashtra Tweet:

महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 1297 झाली आहे. यामध्ये मुंबई 143, पुणे 03, पिंपरी चिंचवड 02, यवतमाळ 01, औरंगाबाद 03, ठाणे 01, नवी मुंबई 02, कल्याण-डोंबिवली 04, मीरा-भाईंदर 01, वसई विरार 01, सिंधुदुर्ग 01, अशा 162 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

राज्यातील मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक केले असून न लावल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. तर शहरातील 381 ठिकाणांसह काही प्रतिष्ठीत हॉस्पिटल्स बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.