Coronavirus In Maharashtra: मुंबई, पुणे येथे लॉकडाउन येत्या 31 मे पर्यंत वाढण्याची शक्यता- मीडिया रिपोर्ट्स
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. खासकरुन मुंबई (MUmbai) आणि पुण्यात (Pune) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. याच कारणास्तव राज्य सरकारने मुंबई मेट्रोपोलिटन रिजन (MMR), पुणे आणि कोविड19 चे हॉटस्पॉट असलेले सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात येणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्स मधून सांगण्यात येत आहे. लॉकडाउन वाढवण्यासंबंधित अद्याप राज्य सरकारकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच अन्य काही क्षेत्रासंबंधित पुढील दोन दिवसात केंद्र सरकार लॉकडाउनच्या काळात कोणत्या गोष्टींना सुट देईल हे स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या भागात कोरोनाचे नवे 998 रुग्ण गुरुवारी आढळून आले आहेत. त्यापैकी 70 रुग्ण ठाणे, 64 रुग्ण नवी मुंबई, 21 रुग्ण हे मीरा भायंदर आणि 6 जण हे कल्याण-डोंबिवली येथील आहेत. त्याचसोबत 46 जणांचा ही कोरोनामुळे बळी गेला आहे. महापालिकेचे नवे आयुक्त एस. चहल यांनी मुंबई मिरर यांना असे म्हटले आहे की, मुंबईत 18 मे नंतर लॉकडाउन वाढवला पाहिजे. अन्यथा महापालिकेचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील.(महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? ठाकरे सरकारच्या नेत्यांची महत्वाची बैठक)

 लॉकडाउन वाढवण्यासंबंधित निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात. एकनाथ शिंदे. अशोक चव्हाण आणि अजॉय मेहता यांच्या उपस्थितीत महापौर बंगल्यावर गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्याअंतर्गत उद्योगधंद्यांना परवानगी दिली आहे. तसेच राज्यातील कामगार वर्गाला आपल्या घरी परतण्याची परवानगी सुद्धा सरकारकडून देण्यात आली आहे.(Covid 19 च्या वाढत्या धोक्यात सुरक्षेच्या मागण्या पूर्ण न केल्यास 18 मे पासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा 'Stay at Home' चा इशारा)

गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, मुंबई, पुणेसह अन्य ठिकाणी खरच लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्याची गरज आहे. तसेच सरकार 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ऑफिसे सुरु करण्याचा विचार करत आहे. परंतु केंद्राकडून मार्गदर्शक सुचना आल्यानंतर याबाबत अधिक स्पष्ट केले जाणार आहे. तर राज्य सरकारने केंद्राला राज्यातील अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात यावा अशी विनंती सुद्धा केली आहे.