Covid 19 च्या वाढत्या धोक्यात सुरक्षेच्या मागण्या पूर्ण न केल्यास 18 मे पासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा 'Stay at Home' चा इशारा
BEST Bus (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गात सुरक्षेच्या मागण्या पूर्ण न केल्यास बेस्ट कामगार संघटनेने काम न करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी बेस्ट कामगार संघटनेने तब्बल 40 हजार कर्मचाऱ्यांना सोमवार, 18 मे पासून 'घरी रहा' (Stay at Home) असे आवाहन केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड 19 च्या वाढत्या विस्तारात बेस्ट कर्मचाऱ्यांनी प्रोटेक्टीव्ह गिअर्सची मागणी केली आहे. अन्यथा काम न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. चालकासह कंडक्टरसाठी हॅंड ग्लोव्ह्ज, पीपीई किट्स, सॅनिटायझर्स, क्वारंटाईनची योग्य सोय, रुग्णालयाची सुविधा आणि 1 कोटी रुपयांचे वैद्यकीय संरक्षण अशा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. (जागतिक कुटुंब दिन 2020 निमित्त आपल्या कुटुंबियांना कोविड 19 पासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करा; महाराष्ट्र शासनाचे आवाहन)

गुरुवारी (14 मे) रोजी आणखी तीन बेस्ट कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली. या नव्या 3 रुग्णांसह आतापर्यंत एकूण 98 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे वाढता धोका लक्षात घेत कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या मागण्या केल्या आहेत. दरम्यान सोमवारी सर्व कर्मचारी कामाला उपस्थित राहतील आणि अशा प्रकाराच्या संपामुळे या कठीण काळात कामावर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासन विरोधी संघटनने दिले आहे. (कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्टच्या 70 कर्मचाऱ्यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह)

कोरोना बाधितांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात 27524 कोरोना बाधित आहेत. त्यातून 6059 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर 20446 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान 1019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे या शहारांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे.