कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं आहे. मात्र तरी देखील लोकांना त्यांच गांभीर्य नसल्याने अजूनही ते रस्त्यावर गर्दी करत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करा, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 'जनता कर्फ्यू'ला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र ती एक परीक्षा होती. यापुढेही सरकारच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यासाठी घरात राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात रहा, सुरक्षित रहा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसंच काही मुठभर लोक नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारायला हवा. जीवावर उदार होऊन डॉक्टर्स, पोलिस काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरी राहण्याची कळकळीची विनंतीही त्यांनी यावेळी केली.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शासकीय यंत्रणांचं कौतुक केलं. त्यांच काम योग्य दिशेने होत असून मुख्यमंत्र्यांशी मी संपर्कात आहे. तसंच हातावर पोट असलेल्यांनी थोडी कळ सोसा. मालकांनी कोणाचेही वेतन कापू नये, असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. (कोरोना विरुद्धचा लढा गंभीरपणे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन)
गर्दी टाळण्यासाठी रेस्टॉरंट बंद असली तरी रेस्टॉरंटमधील किचन सुरु ठेवा. त्यामुळे अनेक वृद्धांची गैरसोय होणार नाही, अशी विनंतीही त्यांनी सरकारला केली. जीवावर उदार होऊन जनतेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस यांच्यासह अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. तसंच त्यांचे उपकार कधीच विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले. शेवटी लवकरात लवकर हे संकट टळो, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.