Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या धोक्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. तसंच पूर्वी केवळ मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड येथे लागू करण्यात आलेले कलम 144 आता राज्यभर लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ जीवनावश्यक सेवा सुरु राहणार असून इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. तसंच गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला लॉकडाऊनचा आदेश फारसा गंभीरतेने घेतला जात नसल्याचे लक्षात येता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा जनतेला आवाहन केले आहे. कोरोना विरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या, असे ट्विट करुन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सूचित केले आहे.

"कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. तसंच कलम 144 लागू करण्यात आल्याने केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू असतील. तर वाहनांमुळे रस्त्यावर गर्दी करु नका आणि नियम मोडू नका," असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे. (लॉकडाउनची परिस्थिती नागरिकांनी गांभीर्याने घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विट:

आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 89 रुग्ण आढळून आले असून राज्यात 3 जणांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर देशातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच पुढील धोका टाळण्यासाठी देशातील अनेक राज्य लॉकडाऊन करण्यात आली आहेत. तसंच गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र जनतेच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाकडे नागरिकांचे काहीसे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी देखील सरकारने दिलेल्या सुचनांचे गंभीरतेने पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसंच नियम आणि कायद्याचे राज्यात नीट पालन व्हायला हवे, असा आदेशही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.