Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना विषाणू रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट; आज राज्यात 34,848 रुग्णांची नोंद
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू कोरोना रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून आली. अगदी दिवसाला जवळजवळ 70 हजार रुग्ण अशी ही संख्या पोहोचली होती. मात्र आता त्यामध्ये घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 34,848 नवीन कोरोना विषाणू रुग्णांची व 960 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे राज्यातील एकूण प्रकरणांची संख्या 53,44,063 झाली असून, मृतांचा आकडा 80,512 वर गेला आहे.

राज्यामध्ये आज 59,073 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत 47,67,053 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 4,94,032 सक्रीय प्रकरणे आहेत. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या लॉकडाऊन चालू आहे. जनतेनेही प्रशासनाला सहकार्य केल्याने राज्यामधील कोरोना रुग्णसंख्या घटत आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक आणि भंडारा जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यांपासून कोविड प्रकरणात सातत्याने घट दिसून येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात 13 मे पर्यंत 1 कोटी 95 लाख 31 हजार 051 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 13 मे रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 341887 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. (हेही वाचा: ही वेळ राजकारणाची नसून जनतेबरोबर उभे राहण्याची आहे; देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधी यांना पत्र)

कोरोनाचे थैमान कमी होत असलेले दिसून येत असताना, राज्यात कोरोनातून बरे झाल्यानंतर 'म्युकरमायकोसिस' हा बुरशीजन्य आजार वाढत आहे. विशेषत्वाने मधुमेही, मुत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींनाहा रोग होत असल्याचे आढळून येत असून, अश्या व्यक्तींनी सहा आठवड्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे असे सांगितले आहे. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येणार आहेत.