Coronavirus In Maharashtra: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 6 जणांची वाढ, राज्यातील एकूण आकडेवारी 122 वर पोहचली
राजेश टोपे (Photo Credits-ANI)

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केला आहे. तर महाराष्ट्रातील सरकारने सुद्धा लॉकडाउन लागू केला असून अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही नागरिक अत्यावश्यक सेवासुविधांची साठवणूक करत असल्याचे दिसून आली. त्यामुळे नागरिकांची किराणामाल किंवा मार्केटमध्ये गर्दी दिसली. परंतु कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घ्या असे वारंवार सांगण्यात येत आहे. तरीही नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता नव्या 6 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 122 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची आता पुन्हा आकडेवारी जाहिर केली आहे. त्यानुसार 6 जणांची भर पडली असून त्यातील 5 जण हे मुंबईतील आणि 1 जण ठाणे येथील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाचे 122 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आली आहे. दुपारपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 116 होती पण यामध्ये वाढ झाली आहे.(सांगली: लॉकडाऊनच्या काळात नागरिकांंना घरबसल्या दूध, भाजीपाला, औषधं मिळणार; 'या' संपर्क क्रमांकावर मिळेल मदत)

दरम्यान, मुंबईत 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. या चार बाधितांमध्ये सदस्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आणि काही जण त्यांच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान सध्या उपचार घेत असलेले 14 सदस्य लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज होतील. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आज पुण्यात नायडू रूग्णालयातूनही महाराष्ट्रात आढळलेले पहिले कोरोनाबाधित दांम्पत्य कोरोना व्हायरस मुक्त झाल्याने घरी गेले आहे. मात्र अजुन पुढील 14 दिवस त्यांना घरीच होम क्वारंटाईन ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.