संपूर्ण जगाला हादरुन टाकणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारताला ग्रासून टाकले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना बाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. मागील 24 तासांत त्यात नवी भर पडली आहे. कोविड-19 च्या 3254 नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 94,041 वर पोहचला आहे. तर प्रकृती सुधारल्यामुळे आजच्या दिवसात 1879 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 94,041 पैकी 44,517 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या 46074 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 3438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने (Maharashtra Health Dept) दिली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठा आहे. दरम्यान ही संख्या सातत्याने वाढत आहे. या शहरांपाठोपाठ औरंगाबाद, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहायला मिळत आहे. मुंबईतील कोरोना बाधितांचा वाढता आकडा हा चिंताजनक असला तरी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. मुंबईचा डबलिंग रेट 24.5 दिवसांवर आला असून मृत्यू दर 3% झाला आहे. तर डिस्चार्ज रेट 44% इतका असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.
ANI Tweet:
3254 new #COVID19 positive cases & 149 deaths reported in Maharashtra today; 1879 people discharged today after recovering from the disease. The total number of positive cases in the state rises to 94,041 including 44,517 discharged people & 3438 deaths: Maharashtra Health Dept
— ANI (@ANI) June 10, 2020
राज्यात कोरोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. परंतु, या लॉकडाऊनचे स्वरुप वेगळे असल्याने अनेक सेवा-सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. सलून व्यवसायाला देखील परवानगी देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान "अजूनही संकट टळलेलं नाही. परंतु, कोरोनाबरोबर लढत असताना आपल्याला अर्थचक्र बंद करून चालणार नाही. त्यामुळे सरकार टप्प्याटप्प्याने सगळं पूर्वपदावर आणत आहे. दरम्यान परिस्थितीचा आढावा देखील सरकार घेत आहे. शिथिलता जीवघेणी ठरत असल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल," असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.