देशात कोरोनाचे संकट आल्याने सरकारकडून ठोस पावले उचली जात आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउचे आदेश येत्या 14 एप्रिल पर्यंत दिले आहेत. मात्र या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या सेवासुविधांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना केले आहे. लॉकडाउनच्या काळाग गेल्या काही दिवसांपासून अन्नधान्याच्या साठा पुरेशा प्रमाणात राज्यात असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. तरीही नागरिकांना तेलाच्या किंमतीत वाढ होणार असल्याची माहिती व्हायरल होत होती. पण आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना दिलासा देत खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या कालवधीत राज्यातील जनतेला अन्न, धान्य मुबलक व सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध योजना आखल्या जात आहे. तसेच भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना पोलिसांनी अडवू नये त्यांना मार्गस्थ करण्यात यावे . शेतकरी व भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करून द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 196 वर जाऊन पोहोचला आहे. ही खूपच धक्कादायक बाब असून या विषाणूचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. ही संख्या अशीच वाढत राहिली तर राज्यातील परिस्थिती खूप गंभीर बनेल अशी चिंता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या 196 पैकी 107 रुग्ण हे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती थोडी चिंताजनक झाली आहे हे यावरुन स्पष्ट होत आहे.