Medical Workers (Photo Credits: IANS)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज मुंबईमध्ये जवळजवळ 2 हजार रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने पुन्हा एकदा 15 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. महत्वाचे म्हणजे पुणे (Pune) जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. आज पुणे जिल्ह्यात तब्बल 3,267 रुग्णांची नोंद व 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात आज नव्याने 1,740 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 2,18,203 इतकी झाली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 845 रुग्णांची नोंद झाली आहे व 4 जणांचा मृत्यू झाला आहे. एनपी भागात 153 रुग्णांची नोंद झाली आहे व छावणी परिसरात 27 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे ग्रामीण भागात 502 रुग्णांची नोंद व 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पुणे जिल्ह्यात 1,830 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 21,730 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात 9,122 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 12, 48, 386 इतकी झाली आहे. (हेही वाचा: Coronavirus In Aurangabad: महाराष्ट्राची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल; मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबाद येथीलही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ)

सध्या पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 11,590 रुग्णांपैकी 355 रुग्ण गंभीर तर 765 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. दुसरीकडे मुंबई शहरात आज 1962 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 343947 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये सध्या 13940 सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. आज शहरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 11531 झाली आहे. महाराष्ट्रात आज 16620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8861 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे.