Coronavirus: कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याची वेतन कपात केली जाणार नाही: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सरकारी कर्मचारी आणि जनता यांना आश्वस्त केले. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्याची वेतन कपात केली नाही. कोरोना व्हायरस हे अचानक उद्भवलेलं मोठं संकट आहे. कोरोना संकट दूर केल्यावर येणारे दुसरे एक संकट येणार आहे. ते म्हणजे आर्थिक संकट. आर्थिक घडी कोणी विस्कटवली तरी, ती मोडू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे इतकेच. म्हणूनच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे फक्त टप्पे केले आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. कृपा करुन समजून घ्या. सहकार्य करा. जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसे या लढाईतील निर्णायक टप्पा पुढे येत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हे युद्ध संपलं नाही

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हे युद्ध संपलं नाही. आपण अटीतटीच्या टप्प्यावर आलो आहोत. या संकटाचा सामना करण्यासाठी संयम आणि जिद्दीची आवश्यकता आहे. आपल्या संयम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या तटभींती मजबूत आहेत. या भींतीवर टकरा मारुन हा विषाणू लवकरच मरेन. तो मरावा यासाठीच आपले प्रयत्न आहेत, असा आत्मविश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला.

चाचणीसाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे यायला हवं

मुंबई आणि राज्यातील काही ठिकाणं ही बंद करण्यात आली आहेत. होय, हे करण्यात आलं आहे. असं करावं लागतं. आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी. कारण, गेल्या काही काळात काही प्रवासी विदेशातून भारतात आणि महाराष्ट्रात आले आहेत. केंद्र सरकारकडून आलेल्या यादीत या लोकांची नावं नव्हती. त्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी झाली नाही. अशा नागरिकांनी स्वत:हून पुढे यायला हवे. आपली माहिती द्या. तपासणी करुण घ्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus च्या उद्रेकाने महाराष्ट्र हादरला; एका दिवसात तब्बल 72 जणांना कोरोना विषाणूची लागण)

घाबरुन जाण्याची गरज नाही, काळजी घ्या

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले  'घाबरुन जाण्याची गरज नाही. काळजी घ्या. अनेकदा आरोग्याच्या हंगामी तक्रारी येतात. जसे की सर्दी, ताप, खोकला. हे आजार नेहमीचे आहेत. त्यामुळे त्याला घाबरून कोरोना व्हायरस सोबत जोडण्याची गरज नाही. गरम पेय, पाणी प्या. अॅलर्जीपासून सर्दी, खोकला आदींपासून दूर राहा. सर्दी खोकला आढळल्यास आपल्या नेहमीच्या रुग्णालयात जाऊन नका. सरकारने कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी सुरु केलेल्या रुग्णालयात जा. जेणेकरुन न जाणो कुणाला याची लागण झाली असेल तर, त्याचे निधान तातडीने केले जाईल.

प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री एकमेकांशी बोलत आहेत

'राज्यातील कोणत्याही मजुरांनी स्थलांतरण करण्याची आवश्यकता नाही. आपण जिथे असाल तेथेच थांबा. असे असतानाही अनेक लोक स्थलांतरण करत आहेत. कृपया असे करु नका. आता हे लोक स्थलांतर करु शकणार नाहीत. कारण राज्य आण जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे' असे सांगतानाच 'राज्य सरकारने अशा नागरिकांच्या भोजनासाठी हजारो केंद्र सुरु केली आहेत. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री एकमेकांशी बोलत आहेत. हे सर्वजण एकमेकांशी माणूसकीने बोलत आहेत', असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

त्याबद्दल दिलगीर आहोत

केंद्र सरकारकडून आलेल्या सूचनांचे पालन करत नागरिकांना रेशन पुरवले जाईल. पण, राज्य सरकारही रेशनिंग पुरवणार आहे. राज्याकडे आवश्यक प्रमाणात अन्नधान्याचा साठा आहे. त्याचे वितरण लवकरच सुरु केले जाईल. लॉकडाऊन स्थिती असल्यामुळे मजूर मिळत नाहीत. काही मर्यादा येत आहेत. पण, ही यंत्रणा लवकरच कार्यन्वीत केली जाणार आहे. काही प्रमाणात त्रास होतो आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी दिलगिरीही व्यक्त केली.

'कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यात जे जे लोक आपले योगदान देत आहेत त्या सर्वांचे आभार. कोणाकोणाची नावे घ्यायची. सर्वजण एखाद्या सैनिकाप्रमाणे काम करता आहे. नागरिकांमध्ये हळूहळू शिस्त येत आहे. पण अद्यापही ही शिस्त पूर्णपणे येणे आवश्यक आहे. जिवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी करु नका. शिवभोजन केंद्रातही स्वस्त दरात जेवण उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यामुळे गर्दी करु नका', असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.