कोरोना विषाणू (Coronavirus) शी लढण्यासाठी भारतात लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे. मात्र तरी दिवसेंदिवस अशा रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात (Maharashtra) नव्याने 72 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानुसार आता राज्यात एकूण रुग्णांची संख्या 302 इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईतील 59, नगरमधील 3, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वाशी, विरारमधील प्रत्येकी 2 जणांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात कोरोना विषाणूची सर्वाधिक प्रकरणे आढळली आहेत.
एएनआय ट्वीट -
72 more persons have tested positive for #COVID19 in Maharashtra, taking the total number of cases in the state to 302. 59 from Mumbai, 3 from Nagar, 2 each from Pune, Thane, Kalyan-Dombivli, Navi Mumbai and Vashi Virar: State Health Department pic.twitter.com/x89hJ9UuaC
— ANI (@ANI) March 31, 2020
कोरोना विषाणूच्या बाब बाबतीत आजचा दिवस महाराष्ट्रासाठी धक्कादायक होता. आज एका दिवसात आतापर्यंच्या सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली. महत्वाचे म्हणजे फक्त मुंबई येथून 59 रुग्ण आढळून आले आहेत. आज सकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात एक कोरोना बाधितांची संख्या 230 होती मात्र आता संध्याकाळपर्यंत ती वाढून 302 वर पोहचली आहे. (हेही वाचा: आरोग्य, पोलीस व कोरोनाशी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात नाही; रोहित पवार यांची माहिती)
दुसरीकडे राज्यामध्ये मुंबई व ठाणे परिसर 14, पुणे 16, नागपूर 04, अहमदनगर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे 39 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. मृत्यूबाबत बोलायचे झाले तर, राज्यात काल 2 जणांचा मृत्यू झाला असून त्यासह राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता 10 झाली आहे. संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाले तर, कोरोना विषाणूचा आकडा 1400 च्या वर गेला आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाची एकूण 1442 प्रकरणे नोंदवली गेली असून, या विषाणूमुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 140 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत 227 लोकांना याचा संसर्ग झाला असून तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.