Coronavirus: आरोग्य, पोलीस व कोरोनाशी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात नाही; रोहित पवार यांची माहिती
रोहित पवार (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतातील कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गामध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशात तेलंगणा सरकारने वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रातही सरकारने असा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आर्थिक मंत्री अजित पवार यांनी आदेश जारी केला आहे, त्याद्वारे सरकारने महाराष्ट्रातील मंत्री, आमदार यांच्यासह सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 60 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामधून आरोग्य, पोलीस व कोरोनाशी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली.

रोहित पवार म्हणतात, ‘सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीमध्ये आरोग्य, पोलीस व कोरोनाशी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांनी काहीही काळजी करु नये. याबाबत मा. अजित पवार स्पष्टीकरण देतीलच. तसेच कुणीही उगाच अफवा पसरु नये.’

शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, ‘कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व खाजगी आस्थापना व उद्योग बंद असून त्यातून प्राप्त होणाऱ्या महसूलात लक्षणीय घट झाली आहे. सर्व शासकीय कार्यालये 5 टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत आहेत. आर्थिक वर्षाअखेर राज्याची एकंदर आर्थिक परिस्थिती विचारात घेता, खर्चात काटकसर करणे तसेच काही खर्च पूढे ढकलणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी, शासकीय/निमशासकीय/विद्यापिठांसह सर्व अनुदानित संस्थामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे’ (हेही वाचा: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री, आमदार यांच्यासह सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात; राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती)

सध्या या अडचणीच्या काळात पोलीस, आरोग्य सेवेतील कर्मचारी, कोरोनाशी संबंधित विभागातील कर्मचारी जनतेसाठी झटत आहेत. या गोष्टीचा विचार करून वेतन कपातीमधून अशा कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहेत.