Coronavirus: पिंपरी चिंचवड येथे आणखी एका व्यक्तीस कोरोना व्हायरस संसर्ग, पुण्यात COVID 19  बाधित रुग्णांची संख्या 16 वर
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता एकाने वाढली आहे. पिंपरी चिंचवड येथे आज आणखी एका रुग्णाची चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे पुणे येथील सीओव्हीआयडी-19 (COVID 1) बाधित रुग्णांची संख्या 16 इतकी झाली आहे. तर राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. कोरोना व्हयारस नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही भा.दं. सं. कलम 144 लागू करण्याच्या हालचाली सुरु आहेत.144 हे कलम जमावबंदी लागू करण्यासाठी लावण्यात येते.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आवश्यकता असेल त्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्याचे संकेत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आज दुपारीच दिले होते. अद्याप जमावबंदी लागू करण्यावर निर्णय झाला नाही. मात्र, कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता हा निर्णय लवकरच अमलात आणला जाण्याची शक्यता आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील अंगणवाड्या आणि मॉलही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील सर्व मॉल बंद राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच सुरु ठेवण्यात येणार आहेत. यात किराना माल दुकाने, फळ आणि भाजीपाला, दूध विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus: पुण्यातील 16 रुग्णांना सुट्टी; 93 जणांच्या ग्रुपमधील एकास कोरोना व्हायरस बाधा, आव्हान वाढले)

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या

क्र शहराचे नाव रुग्णांची संख्या
1 पुणे 16
2 मुंबई 05
3 ठाणे 01
4 कल्याण 01
5 नवी मुंबई 02
6 नागपूर 04
7 यवतमाळ 02
8 अहमदनगर 01
9 औरंगाबाद 01
एकूण 32

विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या तसेच वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी बाहेर भटकू नये. तसेच, पालकांनी आणि शहरातील नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे अवाहन प्रशासनाने केले आहे.