मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात मुंबई येथे एक बैठक पार पडली. या बैठकीत कोरना व्हायरस (Coronavirus) संकट, लॉकडाऊन (Lockdown) आणि राज्यासमोरील आर्थिक आव्हानांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महाविकासआघाडी सरकारमधील घटकपक्ष राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांची मात्र अनुपस्थिती दिसली. या अनुपस्थितीवरुन राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या बैठकीचे काँग्रेस नेत्यांना निमंत्रण नव्हते की ही बैठक केवळ काही नेत्यांपूरती मर्यादीत होती आणि काँग्रेसच्या नेत्यांना बैठकीबाबत माहिती होती, याबाबत अद्याप कोणतेही वृत्त पुढे आले नाही.
कोरोना व्हायरस संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकासआघाडी सरकार जोरदार कार्यरत आहे. तीन पक्षांचे सरकार असूनही अशा संकटाच्या काळात सरकारमधील ताणतणाव, मतभिन्नता मोठ्या प्रमाणावर अद्याप तरी पुढे आली नाही. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमध्ये एकोपा असल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी या बैठकीच्या निमित्तानेका होईना राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (हेही वाचा, Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात बैठक, कोरना व्हायरस संकट, लॉकडाऊन, राज्यासमोरील आर्थिक आव्हानांवर चर्चा)
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांवर नुकतीच टीका केली आहे. या टीकेला एकनाथ खडसे यांच्या विधान परिषद उमेदवारीच्या कथीत दाव्याची पार्श्वभूमी आहे. एकनाथ खडसे काँग्रेस तिकीटावर विधान परिषद लढणार होते, अशा आशयाची प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. यावर एका वृत्तवाहिणीशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, काँग्रेस नेत्यांनी खडसेंना काँग्रेसमध्ये घेण्याची स्वप्न पाहू नयेत. त्यांनी आपल्या पक्षाची कामगिरी सुधारावी. दिल्लीतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि हायकमांड महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांना वारंवार बोलत आहेत. कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तसेच शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते चर्चेत आहेत. तुम्ही कोठे आहात?. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून विरोधी पक्षातूनही काँग्रेसवर टीका होत आहे.
दरम्यन, एका बैठकीवरुन मोठा आणि त्यातही भविष्याचा निष्कर्ष काढता येत नाही हे खरेच. परंतू या बैठकीवरुन चर्चा मात्र रंगली आहे. काँग्रेसच्या मनात नेमके काय सुरु आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे कसे पाहतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे कोरोना व्हायरस संकट कमी झाल्यावर किंवा नजीकच्या काळात मिळू शकतील.