Coronavirus Representational Image (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी घराबाहेर पडणे थांबवावे असे आवाहन वारंवार केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढवणे हे आता नागरिकांवरच अवलंबून असल्याचे म्हटले आहे. राज्यातील सर्व रुग्णालयातील डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. तर महापालिकेने कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या मुंबईतील जवळजवळ 150 पेक्षा अधिक परिसरांना सील केले आहे. तर शनिवारी मुंबईत कोरोना व्हायरसचे 52 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

कोरोना व्हायरच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदत केली जात आहे. तसेच राजेश टोपे यांनी आपल्याकडे मुबलक प्रमाणात मास्क आणि व्हेंटिलेटर्सची संख्या असल्याचे सांगितले आहे. मात्र तरीही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून त्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तर आज मुंबईत कोरोनामुळे मृतांचा आकडा 22 वर पोहचला आहे.(Coronavirus: मुंबईतील धारावी येथे आणखी 2 जणांना कोरोना व्हायरसची लागण)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात खरोखरच आता संकटाचा काळ आहे देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत.