शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (संग्रहित छायाचित्र) (Photo credits: shrad_pawar/facebook)

सध्या राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण इतके वाढले आहे की, हा विषाणू अनेक राजकारणी लोकांच्या घरामध्ये दाखल झाला आहे. याआधी अनेक आमदार व खासदार यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. आता माहिती मिळत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गोविंद बाग (Govind Baug) निवासस्थानी कार्यरत असलेल्या 4 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. संक्रमित झालेले सर्व कर्मचारी हे पवार यांच्या बारामती (Baramati) येथील निवास्थानी कार्यरत आहेत.

गोविंद बाग येथे करोनाची लागण झालेले चारही कर्मचारी शरद पवार यांच्या शेतात आणि बागेत काम करणारी मंडळी आहेत. या चौघांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. सध्या या चारही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असून, त्यांच्या संपर्कातील इतर लोकांचीही करोना चाचणी करण्यात येणार आहे. ही चारही जण जरी सकारात्मक आले असले तरी, त्यांच्या कोणतीही लक्षणे दिसली नसली माहिती बारामतीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले. (हेही वाचा: शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथील काही कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित)

पीटीआय ट्वीट -

शरद पवार यांच्या गोविंद बागेतील जवळपास 50 कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यात स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी आज 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याआधी शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक (Silver Oak) निवासस्थानी देखील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर शरद पवार यांची ब्रिच कँडी रुग्णालयात आरोग्याची तपासणी करण्यात आली. पवार यांची कोरोना व्हायरस चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. दरम्यान, बारामतीमध्ये सध्या 197 रुग्णांवर उपचार सुरु असून, 248 या आजारातून बरे झाले आहे व आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.