सध्या देशात महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. राज्यात 1300 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील ठाणे (Thane) शहरात कोरोना व्हायरस संसर्ग होण्याच्या घटनांची संख्या 33 वर पोहचली आहे. अशात नागरी संस्थेने या साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपययोजना अवलंबल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरातील 15 परिसर कोरोना व्हायरस संसर्गग्रस्त प्रभावित क्षेत्र (Containment Zones) म्हणजेच हॉटस्पॉट्स (Hotspots) म्हणून जाहीर केले आहेत.
याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोरोना संक्रमितांची संख्या 33 झाली आहे. यापैकी 12 कळवा वॉर्डमधील, नऊ जण मुंब्रा येथील, सहा मजिवाडा-मानपाडा येथील, लोकमान्य नगर आणि नौपाडा-कोपरी विभागातील प्रत्येकी दोन आणि वर्तकनगर व उथळसर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. ठाणे महानगरपालिकेने शहरातील 15 ठिकाणांवर हॉटस्पॉट्सचा शिक्का मारून, त्यांना क्वारंटाईन कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.
ठाणे कंटेनमेंट झोन -
काजूवाडी, दोस्ती विहार, हॅपी व्हॅली, साईबाबा नगर, लोढा पॅराडाइझ, रुणवाल गार्डन, धोबी अली, विघ्नहर्ता भवन, मनीषा नगर, एमजी रोड, वृंदावन सोसायटी आणि सूर्यनगर हे कोरोना व्हायरस कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. (हेही वाचा: धारावी येथील सार्वजनिक शौचालयांचे महापालिकेकडून निर्जंतुकीरण, परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा 22 वर)
दरम्यान, शहरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना पाहता पोलिसांनी लॉक डाऊन अजून कडक केले आहे. तसेच या विषाणू वर नियंत्रण आणण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक ठिकाणी उदा. रस्ता, रुग्णालय, कार्यालय, बाजारपेठ इ.ठिकाणी तसेच वैयक्तिक अथवा सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना मास्क परिधान करणे अनिवार्य असणार आहे. याचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.