Coronavirus: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. उमरखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला काही दिवसांपूर्वी मुंबईवरून परतली होती. सध्या जिल्ह्यात 25 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पॉझीटिव्ह रुग्णांचा आकडा 125 असून यापैकी 99 जण बरे होऊन घरी गेले आहे.
ही महिला क्वारंटाईन असताना तिचा स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला होता. शुक्रवारी ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. ही महिला आपल्या कुटुंबियासह 15 दिवसांपूर्वी मुंबई येथून गावी आली होती. तिला गावात शाळेमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले होते. गुरुवारी तिची प्रकृती बिघडल्याने तिला उमरखेडच्या खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तेथील डॉक्टरांनी महिलेला पुसद येथे नेण्याचा सल्ला दिला. (हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक ठिकाणी सुपारी, पान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासह धुम्रपान करण्यास प्रतिबंध- राजेश टोपे)
#यवतमाळ जिल्ह्यात #कोरोना मुळे पहिला #मृत्यू झाला आहे. उमरखेडच्या नागापूर येथील ही महिला असून ती मुंबईहून परतली होती. जिल्ह्यात आता सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ आहे. #यवतमाळ जिल्ह्यात पॉझीटिव्ह रुग्णांचा आकडा १२५ असून यापैकी ९९ जण बरे होऊन घरी गेले आहे. #coronavirus
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 30, 2020
पुसदच्या खाजगी डॉक्टरने या महिलेची लक्षणे पाहून तिला कोव्हीड केअर सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सदर महिलेला व तिच्या पतीला यवतमाळ शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र, शनिवारी उपचार सुरू असताना सकाळी या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या पतीचा रिपोर्टदेखील पॉझिटिव्ह आला आहे.
चिंताजनक बाब म्हणजे मृत महिला मुंबईवरून गावी येत असताना तिच्या संपर्कात 21 जण आले आहेत. सध्या हे सर्व नागापूर गावातील शाळेमध्ये क्वारंटाईन आहेत. त्यामुळे शाळेत क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.