Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन करण्यासह घरात थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक ठिकाणी सुपारी, पान आणि तंबाखूजन्य पदार्शांच्या सेवनासह धुम्रपान करण्यास प्रतिबंध असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा सुद्धा ठोठावण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास यापूर्वी पासूनच बंदी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार नागरिकांनी त्याचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात जरी कोरोनाचा वेग मंदावला असला तरीही त्याची साखळी तुटली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. परंतु राज्य सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम असून त्याबाबत तयारी सुरु करण्यात आली आहे.(महाराष्ट्रात तैनात SRPF च्या 545 जवानांना कोरोना व्हायरसची लागण; योग्य उपचारानंतर 388 जण सुखरुप घरी परतले- गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 62228 वर पोहचला असून 2098 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार विभागणी केली आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती पाहून नियम शिथील करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या संपत आहे. त्यामुळे 31 मे नंतर लॉकडाऊन बाबत सरकार कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.