Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून देशासह महाराष्ट्र (Maharashtra) राज्य देखील लॉकडाऊनच्या स्थितीत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे साहजिकच आरोग्य, पोलिस यंत्रणांवरील ताण अधिक आहे. महाराष्ट्र पोलिस अहोरात्र मेहनत घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष आहेत. परंतु, गेल्या काही दिवसात पोलिसांवरील ताण अधिक वाढला असल्याने त्यांना विश्रांती देण्यासाठी SRPF च्या जवानांना तैनात करण्यात आले. दरम्यान त्यापैकी 545 SRPF जवानांना कोरोनाची लागण झाली असून 388 जण सुखरुप घरी परतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे. (Maharashtra Police: गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमित महाराष्ट्र पोलिसांच्या संख्येत लक्षणीय वाढ, कोरोना बाधितांची एकूण संख्या 2325 वर)

मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर यांसारख्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी एसआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्यापैकी 545 SRPF जवानांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र 388 जणांची प्रकृती योग्य उपचार मिळाल्याने सुधारली असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तसंच गृहमंत्र्यांनी या सर्व जवानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या सर्व जवानांना योग्य उपचार आणि उत्तम सुविधा मिळाल्याचे त्यांनी गृहमंत्र्यांशी बोलताना सांगितले.

Anil Deshmukh Tweet:

तसंच महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस खात्यातील अधिकारी किंवा कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना देखील चांगल्या पद्धतीने उपचार मिळतील, याकडे पोलिस खात्याचं पूर्ण लक्ष आहे, असे सांगून गृहमंत्र्यांनी पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबियांना आश्वस्त केले आहे. दरम्यान महाराष्ट्रातील एकूण 2325 पोलिस कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. तर आतापर्यंत 26 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.