देशामध्ये सर्वाधिक बाधित राज्य म्हणून सध्या महाराष्ट्राकडे पहिले जात आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात आज 2682 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व अशा प्रकारे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 62,228 अशी झाली आहे. मात्र यामध्ये एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला आहे. आज एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 7358 रुग्ण मुंबई मनपा क्षेत्रातील आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशाप्रकते आतापर्यंत 26,997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11 दिवस होता, तो आता 15.7 दिवस झाला आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 43.38 टक्के एवढे आहे व राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज 2682 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 62,228 वर)
राजेश टोपे ट्वीट -
कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले.७३५८ रुग्ण मुंबई मनपा क्षेत्रातील असून एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.आतापर्यंत २६९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 29, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी, 62 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 35 हजार 467 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 976 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 116 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे विभाग- 58, नाशिक- 32, पुणे-16 या विभागात सर्वात जास्त मृत्यू आहेत. कोरोना विषाणू मुळे राज्यात आतापर्यंत 2098 मृत्यू झाले आहेत.