Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज सकाळी 48 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 13 हजार 890 इतकी झाली आहे. त्यापैकी 9 हजार 961 रुग्ण बरे झाले असून 469 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील 3 हजार 460 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे.

आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मनपा भागातील 32 तर ग्रामीण भागातील 16 जणांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र पोलिस दलात एकूण 9,217 पोलिसांना कोरोना व्हायरसची बाधा; मागील 24 तासांत 121 नवे रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू)

मराठवाड्यातील बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्रात 11 हजार 147 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात 266 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 11 हजार 798 इतका झाला आहे. यातील 2 लाख 48 हजार 615 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तसेच सध्या 1 लाख 48 हजार 150 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.