बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी धर्मांतर केले. शास्त्रींच्या हस्ते त्यांनी दीक्षा घेतली आणि हिंदू धर्मात प्रवेश केला. या सर्वांनी स्वच्छेने हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हिंदू धर्मियांना आपण ही 10 लोकांची भेट देत असल्याचे धीरेंद्र शास्त्री म्हणाले. दरम्यान, इस्लामधर्मीयांचा हिंदू धर्मात झालेल्या या प्रवेशावरुन नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाची सांगता झाली. त्या वेळी हे धर्मांतर झाले.
सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे धर्मांतर- जमीर शेख
जमीर शेख यांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांचे आभार मानले. ते म्हणाले, लहानपणापासूनच आपणास हिंदू रितीरिवाजांची आवड आहे. आपण पूजापाठ करत असतो. सनातन धर्मावरील श्रद्धेमुळेच आपण हे धर्मांतर करत असल्याचे शेख यांनी म्हटले. दरम्यान, आपल्या दोन कन्यांचा विवाहसुद्धा आपण हिंदू धर्मातच करुन दिल्याचे त्यांनी सांगितले. आपण बागेश्वर धाम यांचे व्हिडिओ पाहून प्रेरीत झालो. ज्यामुळे आपल्यातील सनातनी हिंदू जागा झाला. त्यानंतर बजरंग दलाच्या मदतीने आपण येथे पोहोचलो, असून हिंदू धर्माचा स्वीकार केल्याचेही जमीर शेख यांनी सांगितले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
धीरेंद्र शास्त्री हिंदु हृदयाचार्य- खासदार डॉ. भागवत कराड
धक्कादायक असे की, भाजप खासदार डॉ. भागवत कराड यानी धीरेंद्र शास्त्री यांना हिंदु हृदयाचार्य ही उपाधी देत असल्याचे म्हटले. या वेळी बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, हनुमान म्हणजे अंजनीपूत्र पवनसूत आणि विद्या, ज्ञान, बलबुद्धी आणि आठ सिद्धी होय. ते नवनिधींचे दाता आहेत. त्यांची अखंडीत सेवा करा. हनुमान चालिसाचे पठण करा. तुमच्यावरील संकटाचे निवारण होईल, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी दौरा टाळला?
धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची चर्चा होती. मात्र, ज्या संभाजीनगर शहरात शास्त्रींचा कार्यक्रम होता त्याच शहरात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रदीर्घ काळ उपोषणाला बसल होते. परिणामी बराच काळ उपाशी राहिल्याने त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे शास्त्रींच्या कार्यक्रमाला येणारे फडणवीस जरांगे पाटील यांचीही भेट घेणार का? अशी चर्चा होती. मात्र, वेळे अभावी आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, फडणवीस यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजीनगरला जाणे टाळल्याची समाजात चर्चा आहे.