Maharashtra Budget 2021-22:  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अर्थसंकल्पाचे कौतुक म्हणाले, 'बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा निर्णय ऐतिहासिक'
Nana Patole | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्प 2021-22 ( Maharashtra Budget 2021-22) चे स्वागत गेले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक करताना शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय एतिहासिक आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे. याशिवाय कोरोना व्हायरस महामारीचे संकट कायम असताना राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देत महाराष्ट्राला विकासपथावर घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना नाना पटोले यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संकटामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर महसूली तूट आली ाहे. असे असतानाही महाविकासआघाडी सरकारने आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन, महिला, तरूण, विद्यार्थी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पासांठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यामुळे मागच्या सरकारच्या काळात ठप्प झालेली विकासाची प्रक्रिया सुरु होणार असून महाराष्ट्राची विकासपथावर वेगाने घोडदौड सुरु होईल. (हेही वाचा, Maharashtra Budget 2021-22: ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प एक रडगाणे, कोणालाच काही मिळाले नाही- देवेंद्र फडणवीस)

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतूदी

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालये, नगर पंचायती आणि नगरपरिषदांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 7 हजार 500कोटी रूपये जाहीर.
  • सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, अमरावती, परभणी येथे नविन वैद्यकीय माहविद्यालये उभारण्यात येणार.
  • कोरोना काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला हाथ देणा-या बाळीराजाला साथ देण्यासाठी तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार.
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीसाठी 2 हजार कोटी, पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी 9700 कोटी, विकेल ते पिकेल या योजनेसाठी 2 हजार 100 कोटी, कृषीपंपाच्या जोडणीसाठी 1500 कोटी तर सिंचनासाठी जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना 12 हजार 919 कोटी, जलंसधारण प्रकल्पांसाठी 2 हजार 60 कोटींची तरतूद केली असून गोसीखुर्द प्रकल्पासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • ग्रामीण भागाच्या विकासासाठी 7 हजार 500 कोटी, पुणे रिंगरोड, मुंबई गोवा किनारी मार्ग, पुणे नगर नाशिक रेल्वे मार्ग, ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासह मुंबईतील विकास प्रकल्पांसाठीही भरघोस निधीची तरतूद.
  • राज्यातील, रस्ते, तिर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यासोबतच महाज्योती, सारथी, बार्टी या संस्थांसाठीही प्रत्येकी दीडशे कोटींची तरतूद.
  • विद्यार्थीनी, गृहिणी, कष्टकरी महिलांसाठी राज्य सरकारनं नव्या योजना जाहीर केल्या आहेत. घराची नोंदणी महिलांच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत.
  • राज्यातील ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत एसटी प्रवास उपलब्ध.
  • शहरातील महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणखी तेजस्विनी महिला बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राज्य राखीव पोलीस दलात राज्यातील पहिलीच स्वतंत्र महिला पोलीसांची तुकडी स्थापन करण्यात येणार.

दरम्यान, राज्य सरकाच्या योजनेच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अर्थसंकल्पातील तरतुदींच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून राज्याच्या प्रगतीचा वेगही वाढणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.