Balasaheb Thorat | (Photo Credits: Facebook)

एमआयएम (AIMIM) पक्षाने महाविकासआघाडी सरकारला दिलेल्या युतीच्या ऑफरवरुन राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. विरोधक आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूकडून जोरकस प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस ही धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्म समभाव या विचारांवर विश्वास ठेवते. कोणत्याही धर्मातील कट्टरतावाद काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे एआयएमआयएम पक्षासोबत युतीचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ही ऑफर दिली होती.

बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हटले आहे की, एमआयएम आणि भाजप या दोन्ही पक्षांचा कट्टरतावाद सारखाच आहे. त्यामुळे सर्वधर्म समभाव ठेवणाऱ्या कोणत्याच पक्षाला ही बाब मान्य होणारी नाही. थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या दाव्यालाही प्रत्युत्तर दिले. राज्यातील महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे. सरकारमधील 170 आमदारांची एकजूट कायम आहे. त्यामुळे त्यांनी कितीही बोलले तरी फरक पडत नाही. ते जितके प्रयत्न करतील तितकी आमची एकजूट अधिक भक्कम होत जाईल असेही थोरात म्हणाले. दरम्यान, भाजपचे नेते केहीही बोलतील आणि त्यावर आम्ही प्रतिक्रिया देत बसायचे ही आपेक्षा योग्य नसल्याचेही थोरात यांनी यावेळी सांगितले. (हेही वाचा, NCP Leaders On AIMIM Alliance: एमआयएम-राष्ट्रीवादी युतीची चर्चा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी दिल्या प्रतिक्रिया)

खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकासआघाडीला ऑफर दिली होती. जलील यांनी म्हटले होते कीू, माझ्या आईचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आले होते. त्यावेळी आमची विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी आम्ही त्यांना ऑफर दिली की, देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या. आमच्या ऑफरवर राजेश टोपे काहीच बोलले नाहीत, असेही जलील यांनी सांगितले. दरम्यान, आमच्यावर (एमआयएम) भाजपची बी टीम असल्याची नेहमीच टीका होते. आम्हाला ही टीका मान्य नाही. आम्ही थेट ऑफर देतो आम्ही तुमच्यासोबतही युती करायला तयार आहोत. आमच्यासोबत या. पण खरे सांगायचे तर प्रत्येकाला फक्त मुस्लिम मते आवश्यक आहेत. बाकी काही नको. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे, असेही जलील म्हणाले. जलील हे एबीपी माझाशी बोलत होते.