Balasaheb Thorat | (Photo Credit - Twitter/ANI)

काँग्रेस (Congress) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) प्रदेश नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा पाठिमागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या चर्चांवर मिष्कील टिप्पणी करत बाळासाहेब थोरात यांनी आज भाष्य केले. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबईतील दादर येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस नेत्यांची एक बैठकही एच के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडते आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांना प्रसारमाध्यमांनी त्यांच्या नाराजीबाबत विचारले असता ते बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांना प्रसारमाध्यमांनी विचारताच ते म्हणाले, मी नाराज आहे? काय सांगता? मला तर याबाबतकाहीच माहिती नाही. जे काही समजले ते प्रसारमाध्यमांतूनच! मात्र, एक गोष्ट खरी आहे. मी नाराज नाही. नाराज नव्हतो. अर्थात काही पत्रव्यवहारांचे म्हणाल तर तो सर्वच संघटनेत सुरु असतो. आमच्याकडूनही तो झाला. इतकेच. (हेही वाचा, बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ)

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील सध्या मुंबई येथे तळ ठोकून आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, काँग्रेसमध्ये कोणताही वाद अथवा नाराजी नाही. काँग्रेस परीवार एक आहे. जे काही गैरसमज होते ते बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलून दूर करण्यात आले आहेत. रायपूर येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनात बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असल्याचे एचके पाटील यांनी सांगितले.

ट्विट

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात पक्षांतर्गत वाद आहे. त्यातूनच थोरात नाराज झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांची प्रसारमाध्यमांसमोरील प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.