मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदान प्रतिज्ञापत्रासाठी तारिख निघून गेलेली नोटरी वापरल्याने अर्ज रद्द करा, आशिष देशमुख यांची मागणी
देवेंद्र फडणवीस आणि आशिष देशमुख (Photo Credits-File/Facebook)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Assembly Elections) शुक्रवारी (5 ऑक्टोंबर) अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणूकीसाठी तिकिट देण्यात आलेल्या उमेदवारांची नावे स्पष्ट झाली आहेत. याच पार्श्वभुमीवर भाजप पक्षातील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी नागपुर साउथ वेस्ट (Nagpur South West) येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरुन आता काँग्रेसचे नेते आशिष देशमुख  (Ashish Deshmukh) यांनी प्रश्न उपस्थितीत केला आहे.

आशिष देशमुख यांनी असे म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी भरलेला उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. परंतु फडणवीस यांनी मतदान प्रतिज्ञापत्रासाठी तारिख निघून गेलेली नोटरी वापरल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आयोगाने फडणवीस यांचा विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी मागणी केली आहे.

परंतु नोटरीवरील स्टॅम्प हा जुना असल्याचे फडणवीस यांनी मान्य केले आहे. परंतु केंद्र सरकारकडून नोटरीची मर्यादा पाच वर्षांसाठी वाढवून दिली असून त्याबाबत ऑर्डर सुद्धा दिली आहे. एवढेच नाही तर यापुढे कोणताही तांत्रिक अडचण येणार नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामुळे फडणवीस यांना दिलासा मिळाला आहे.(मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात 100 टक्के संपत्तीत वाढ, जाणून घ्या किती)

विधानसभा निवडणूकीसाठी नागपुर साउस वेस्ट येथून भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी दिली आहे.तर काँग्रेसकडून आशिष देखमुख यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष देशमुख यांच्यामध्ये लढत होणार आहे. येत्या 21 ऑक्टोंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडणार असून त्याचा निकाल 24 ऑक्टोंबरला लागणार आहे.