शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Archived images)

आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजप भलताच आग्रही आहे. पण, या आग्रहाला शिसेनेकडून काहीच भाव मिळताना दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात खरोखरच ही युती होणार की, हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार? याबाबत विरोधकांसह राज्याच्या राजकारणात जोरदार उत्सुकता आहे. ही उत्सुकता कायम असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकरे यांनी बंद दाराआड चर्चा केली. सुमारे २० ते २५ मिनीटे चाललेल्या या बैठकीत नेमकी कशायवर चर्चा झाली याबाबतचा तपशील बाहेर आला नाही. त्यामुळे या चर्चेबाबतही उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

गोदावरी अर्बन बँकेच्या नरिमन पॉईंट येथील शाखेचे सोमवारी उद्धाटन झाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही उपस्थित होते. या वेळी येथील एका हॉटेलमध्ये दोघांनी बंद दाराआड चर्चा केली, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केली असली तरी, यात युतीसंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण, ही भेट केवळ १५ ते २० मिनीटेच झाली. युतीबाबत बोलणी झाली असती तर, या भेटीचा कालावधी अधिक असता, असे मत राजकीय निरिक्षकांनी नोंदवले आहे. (हेही वाचा, आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, विरोधकांकडून सरकार कोंडीचा प्रयत्न)

दरम्यान, सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनाच्याच पार्श्वभूमिवर दोन्ही नेत्यांमद्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे. विद्यमान सरकारच्या कालावधीतील हे शेवटच्या टप्प्यातील अधिवेशन आहे. त्यामुळे सत्तासहभागी असलेल्या मित्रपक्षाने सरकारला (भाजप)अडचणीत आणू नये असा मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये याच मुद्द्यावर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.