कोकणातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करा; सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश
अशोक चव्हाण (Photo Credit: PTI)

आगामी गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर कोकणाकडे (Konkan) जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिले आहेत.

कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आज चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ पदाअधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 9 हजार 615 नवे कोरोना रुग्ण; तर 278 जणांचा मृत्यू)

दरम्यान, या बैठकीत चारही पालकमंत्र्यांनी कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या जिल्हानिहाय स्थितीबाबत चव्हाण यांना माहिती दिली. तसेच दुरूस्तीसंदर्भात अनेक सूचना मांडल्या. त्यानंतर बैठकीला संबोधित करताना अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांसह संयुक्तपणे दौरा करावा आणि प्रमुख रस्त्यांची पाहणी करावी. आवश्यकता असेल त्याठिकाणी रस्ते आणि पुलांच्या दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी त्याची पूर्तता करावी. पूर्वीपासून प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची कामेदेखील विहित कालावधीत पूर्ण करून घ्यावीत. ज्या ठिकाणी कामे अधिक काळ चालणार आहेत. त्याठिकाणी वळण रस्ता सुस्थितीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, अशा सूचनादेखील यावेळी अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.