Kranti Redkar Wankhede (Photo/ANI)

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरु आहे. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप मंत्री मलिक करत आहेत. आता नवाब मलिक यांनी एका चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि कॅप्टन जॅक नावाच्या व्यक्तीमध्ये झालेले संभाषण दिसत आहे. यामध्ये तो व्यक्ती दावा करत आहे की, त्याच्याकडे नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्यात संबंध असल्याचे पुरावे आहेत. या चॅटवर नवाब मलिक यांनी 'ओह माय गॉड' म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता या चॅटबाबत क्रांती रेडकरचा खुलासाही समोर आला आहे.

चॅटमध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो नावाचा माणूस आपल्याकडे नवाब मलिक आणि दाउद यांचा फोटो असल्याचे सांगतो. यावर क्रांती रेडकर तो फोटो आपल्याला मिळाल्यास त्याबदल्यात इनाम मिळेल असे सांगते. पुढे ती व्यक्ती क्रांतीला एक फोटो पाठवते ज्यामध्ये राज बब्बर आणि नवाब मलिक दिसत आहेत. क्रांती रेडकर रागाने हा राज बब्बर असल्याचे म्हणते. यावर ती व्यक्ती सांगते की, राज बब्बरची पत्नी त्याला लाडाने दाऊद म्हणते.

खुद्द नवाब मलिक यांनी या चॅटचा स्क्रीनशॉट ट्विट केला आहे. यावर आता क्रांती रेडकर यांचे उत्तर आले आहे. क्रांती रेडकर यांनी ही चॅट फेक असल्याचे म्हटले आहे. जॅक नावाच्या व्यक्तीशी तिचे बोलणे झाले नसल्याचे क्रांतीने म्हटले आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा शहानिशा न करता पोस्ट केली आहे. याबाबत तिने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. ‘एका ट्विटर हँडलने माझे खोटे हँडल तयार केले आहे आणि एक बनावट चॅट तयार केले. त्या खोट्या हँडलसाठी त्याने माझा फोटो प्रोफाईल फोटो म्हणून वापरला आहे. नवाब मलिक यांनी खातरजमा न करता या बनावट चॅटचा स्क्रीनशॉट त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.’ असे क्रांतीच्या तक्रारीत म्हटले आहे. (हेही वाचा: Nawab Malik गोष्टींची खातरजमा करून माहिती पोस्ट करू शकतात; ज्ञानदेव वानखेडे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही)

दरम्यान, आता कॅप्टन जॅक स्पॅरोने स्पष्ट केले आहे की, नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या चॅटचा स्क्रीनशॉट हा मीम्सचा भाग आहे आणि तो एडीट केला आहे. ही गोष्ट खरी नाही. त्या व्यक्तीच्या या स्पष्टीकरणाचा स्क्रीन शॉट शेअर करताना क्रांती रेडकर यांनी लिहिले की, 'खूप दुःखद. हे प्रकरण एवढ्या म्मोठ्या थराला जाईल, असे वाटले नव्हते.