विदर्भात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावेत. मदतीसंदर्भात स्वतंत्र जीआर काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई देऊन मदत करावी, अशी मागणीदेखील फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (हेही वाचा - आरोग्याच्या प्रश्नावर रोहित पवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा; सोशल मीडिया पोस्टवरून सांगितली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक)
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारने मध्य प्रदेश सरकारशी योग्य समन्वय न ठेवल्याने विदर्भात पूरस्थिती उद्भवली आहे. राजीवसागरचे पाणी सोडल्यानंतर ते 36 तासांनी पोहोचते. सरकारने नागरिकांना वेळीच सतर्कतेचा इशारा दिला असता तर नुकसान टाळता आले असतं. मात्र, तसं न केल्याने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.
36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.#Floods #Vidarbha pic.twitter.com/XhOi7DZ13i
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 31, 2020
पूरामुळे भंडारा जिल्ह्यात तब्बल 5 हजार कुटुंब बाधित असून, चंद्रपुरात 13 गावे बाधित आहेत. तसचे गोंदियामध्ये 40 गावे पुराच्या विळख्यात आहेत. गडचिरोलीत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने पूरात अडकलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. एनडीआरएफची मदत वेळीच घेता आली असती. मात्र, त्यालाही उशीर झाला. आता राज्य सरकारने त्वरित पंचनामे करून वेळीच मदत करावी. मदतीसंदर्भात कोल्हापूरच्या पुराच्या धर्तीवर स्वतंत्र जीआर काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.