Navi Mumbai: धक्कादायक! 500 रुपयांच्या वादातून सहकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या; आरोपीला अटक
Arrest (PC -Pixabay)

Navi Mumbai: नवी मुंबईत 500 रुपयांच्या वादातून एका 30 वर्षीय व्यक्तीला आपल्या सहकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या (Murder) केल्याप्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी शनिवारी पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेला माहिती दिली. पनवेल शहर पोलीस (Panvel City Police) ठाण्याचे निरीक्षक अंजुम भगवान यांनी पीटीआयला सांगितले की, पीडित विकी चिंडालिया (वय, 27) हा भंगार कलेक्टर असून तो 8 ऑगस्ट रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळ (Panvel City Police Station) मृतावस्थेत आढळून आला होता.

प्राप्त माहितीनुसार, पीडित व्यक्ती रेल्वे स्थानकाजवळच्या परिसरात काम करत होता. तिथे तो एका सहकाऱ्यासोबत राहत होता. घटनास्थळावरील अनेक लीड्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पीडित व्यक्तीचा सहकारी सचिन शिंदे याचा शोध घेतला आणि गुरुवारी त्याला औरंगाबाद जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी पकडले. (हेही वाचा -Bjp Leader Sana Khan Murder Case: नागपूरच्या बेपत्ता भाजप नेत्या सना खान यांची पतीकडून बेदम मारहाण करून हत्या; आरोपी पतीला अटक)

चौकशी दरम्यान, शिंदेने सांगितलं की पीडित व्यक्तीने त्याचे 500 रुपये देणे बाकी होते. हत्येच्या दिवशी मद्य प्राशन करत असताना दोघांनी त्यावर वाद घातला. आरोपीने पीडित व्यक्तीवर चाकूने वार करून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

दुसर्‍या एका घटनेत, नवी मुंबईत चार जणांनी चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. ही घटना मंगळवारी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान घडली. यासंदर्भात जखमी अनिल जाधव (वय, 26) या मजुराने फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, चार आरोपींनी त्याला आणि त्याचा 35 वर्षीय मित्र विनोद राठोड यांना एका दुकानात नेले, जिथे त्यांनी त्यांना कैद केले. आरोपींनी त्यांना स्टंपने मारहाण केली. त्यांनी राठोडला भिंतीवर ढकलले, त्यानंतर तो कोसळला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.